Sunday, January 20

आमदार बलात्कार करतात, तरीही पंतप्रधान गप्प बसतात : राहुल गांधी

जयपूर, उत्तर प्रदेशात एक आमदार महिलेवर बलात्कार करतो. पण पंतप्रधानांच्या तोंडून एक शब्द निघत नाही, अशा शब्दांमध्ये काँग्रेसअध्यक्ष राहुल गांधींनी नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. पंतप्रधान बेटी बचाओ बेटी पढ़ाओची घोषणा देतात. महिलांसाठी ही घोषणा चांगली आहे. मात्र ज्यावेळी खरंच काहीतरी करुन दाखवायची वेळ आली, तेव्हा त्यांनी काहीच केलं नाही, अशी टीका राहुल यांनी केली. ते कोटामध्ये महिला काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करत होते.
यावेळी राहुल गांधींनी महिला काँग्रेसचं तोंडभरुन कौतुक केलं. ‘महिला काँग्रेस अनेक बाबतीत आम्हाला मागे टाकून पुढे गेल्या आहेत. काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या रस्त्यावर, शहरात, गावात जागोजागी पाहायला मिळतात. महिला काँग्रेसनं पक्षाच्या सर्व विभागांना मागे टाकलं आहे. मात्र जेव्हा भाजपाशी दोन हात करण्याची वेळ येते, तेव्हा महिला काँग्रेस दिसत नाही. तुम्ही सर्व आघाड्यांवर भाजपाशीसंघर्ष कराल, अशी आशा आहे,’ असं राहुल गांधी म्हणाले.
लवकरच विधानसभा निवडणुकीला सामोरं जाणाऱ्या राजस्थानात भाषण करताना राहुल यांनी इंधन दरवाढीवरुन सरकारवर तोंडसुख घेतलं. जगभरात पेट्रोल, डिझेलचे दर कमी होत असताना भारतात मात्र इंधनाचे दर भडकले आहेत. आधी गॅस सिलेंडर चारशे रुपयांना मिळत होता. आता त्यासाठी नऊशे रुपये मोजावे लागतात. काँग्रेसच्या हातात सत्ता दिल्यास ही महागाई कमी होईल. त्यामुळे काँग्रेसला विजयी करा, असं आवाहन त्यांनी केलं.