Sunday, January 20

आमची सायकल ट्युबलेस, कधीच पंक्चर होत नाही : अखिलेश यादव

नवी दिल्ली, आमची सायकल ट्युबलेस आहे. त्यामुळे ती कधीच पंक्चर होत नाही, अशी प्रतिक्रिया उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी दिली आहे. उत्तर प्रदेशच्या जनतेचा कौल आणि निवडणुकीचा निकाल स्वीकारतो. यावेळी अखिलेश यादव यांनी कार्यकर्त्यांचेही आभार मानले आहेत.

ते म्हणाले, भाजप सरकार आमच्या पेक्षाही चांगलं काम करेल, अशी अपेक्षा करतो. मायावतींनी जर एश्टबाबत प्रश्न उपस्थित केले असतील, तर सरकारने त्याची चौकशी केली पाहिजे. बुलेट ट्रेनसाठी जनतेनं भाजपाला मतदान केलं. नवं सरकार सपापेक्षा चांगलं काम कसं करणार हे मला पाहायचं आहे. उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांसह देशातील शेतकऱ्यांचं कर्ज आता माफ होईल, अशी अपेक्षा करतो. शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं, तर आनंदच होईल, असं म्हणत त्यांनी भाजपावरही निशाणा साधला आहे. 5 वर्षांत उत्तर प्रदेशला प्रगतिपथावर नेण्याचा प्रयत्न केला. काँग्रेससोबत आघाडी कायम ठेवू, असंही अखिलेश यादव म्हणाले आहेत.

अखिलेश यादवांनी अखेरपर्यंत मोदींना कडवी झुंज दिली होती. प्रत्येक मुद्यावर ते संयत भाषेत बोलायचे. तथापि वर्षभरापासून यादव कुटुंबात सुरू असलेला अंतर्कलह समाजवादी पक्षाच्या पराभवाला निश्चितपणे कारणीभूत ठरला आहे. याखेरीज अखिलेश यादवांच्या 5 वर्षांच्या कारकिर्दीत ढासळलेली कायदा आणि सुव्यवस्था, मुझफ्फरनगरसह राज्याच्या विविध भागातल्या दंगली, नोकऱ्यांपासून सर्व क्षेत्रात यादव समाजाला मिळणारे प्राधान्य, आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये समन्वयाचा अभाव, अशा विविध कारणांमुळे मतदारांची नाराजी मतदानातून स्पष्ट झाली आहे.

उत्तर प्रदेशात काँग्रेसला भरघोस जागा मिळतील, अशा चमत्काराची अपेक्षा काँग्रेसजनांसह कोणालाही नव्हती. कारण राज्यात काँग्रेसचे नेते अधिक आणि कार्यकर्ते कमी अशी अवस्था अनेक वर्षांपासून आहे. देवरिया ते दिल्ली अंतराची राहुल गांधींची किसान यात्रा, जागोजागी झालेल्या खाटसभा आणि निवडणुकीतल्या प्रचार सभांचाही मतदारांवर फारसा प्रभाव पडला नाही. सोनिया गांधींसह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रचारासाठी कुठेही हिंडले नाहीत. प्रियंका गांधी फक्त एका सभेत बोलल्या. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे बहुतांश उमेदवार समाजवादी पक्षाच्या भरवशावरच निवडणूक लढत होते.