Sunday, January 20

अॅमेझॉनची मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात

नवी दिल्ली, नोटाबंदीनंतर ऑनलाइन व्यवहार करणाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. लॅपटॉप आणि मोबाईल यांचा वाढता वापर यांमुळे ऑनलाइन शॉपिंगमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली. अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, इ-बे यांसारख्या साईटसवरुन खरेदी करणाऱ्यांचे प्रमाण वाढले. आता या कंपन्यांचा विस्तार झाल्यावर त्यांनी नोकरभरतीही केली. पण मागच्या काही काळात आर्थिक गणिते कोलमडल्याने काही कंपन्यांनी कर्मचारी कपातही केली. अॅमेझॉननेही नुकतीच आपल्या कर्मचारी संख्येत कपात केली असून गेल्याच आठवड्यात ६० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन कमी करण्यात आले आहे.
ई कॉमर्स कंपन्यांमध्ये अग्रेसर असलेल्या या कंपनीने जगभरातील आपल्या व्यवसायाचे रि-स्ट्रक्चर करण्यासाठी हे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे. इतकेच नाही तर येत्या काळात कंपनी आपल्या आणखी काही कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन कमी करु शकते असे सांगण्यात आले आहे. इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, केवळ भारतातच नाही तर वेगवेगळ्या कारणांनी जगभरात कर्मचाऱ्यांना कमी करण्यात येत असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर सध्या असलेले कंपनीतील गट सुनियोजित करण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचलले आहे असे कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
कंपनीच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांवरी अस्थिर होणे स्वाभाविक आहे. मात्र कामावरुन कमी करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना दुसरे काम देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत असेही कंपनीकडून सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर येत्या काळात भारतात ४००० पदांसाठी भरती सुरू आहे. फेब्रुवारीत अॅमेझॉनने सिएटल हेड ऑफिसमधून काही कर्मचाऱ्यांना कमी केले. कंपनी नव्याने काही नियोजन करत असून त्याअंतर्गत कर्मचाऱ्यांना नवीन काम देण्यात येईल असे सांगण्यात येत आहे.