Saturday, February 23

अभिनेत्री ममता कुलकर्णीची मुंबईतील घरं सील करण्याचा आदेश

ठाणे, बॉलिवूडमधील माजी अभिनेत्री ममता कुलकर्णीची संपत्ती जप्त करण्याचा आदेश ठाण्यातील विशेष एनडीपीएस कोर्टाने दिला आहे. 2016 मध्ये ठाणे पोलिसांनी कोट्यवधी रुपयांच्या अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला होता. यातील प्रमुख आरोपींमध्ये ममता कुलकर्णीचा समावेश आहे.
एनडीपीएसच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एच. एम. पटवर्धन यांनी अंमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणात ममता कुलकर्णी हजर न झाल्याने मुंबईतील विविध भागात असलेले तीन आलिशान फ्लॅट्स सील करण्याचा आदेश मागील आठवड्यात दिला होता. ममताच्या या तीन आलिशान फ्लॅट्सची किंमत सुमारे 20 कोटी रुपये असल्याचं म्हटलं जात आहे.
विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी सांगितलं की, “याबाबत अपील केल्यानंतर कोर्टाने ममता कुलकर्णीच्या तिन्ही संपत्ती सील करण्याचा आदेश दिला.” तब्बल दोन हजार कोटी रुपयांच्या अंमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी कोर्टात हजर न झाल्याने ममताला फरार घोषित करण्यात आलं आहे.
दोन वर्षांपूर्वी या प्रकरणात ममता कुलकर्णीला विकी गोस्वामीसह मुख्य आरोपी बनवण्यात आलं होतं. अंमली पदार्थांच्या तस्करीत तिचा समावेश होता. “ममता कुलकर्णी आणि विकी गोस्वामी यांच्या आत्मसमर्पणाचा प्रयत्न करु,” असं ठाणे पोलिसांनी सांगितलं होतं.
ममता कुलकर्णी आणि तिचा कथित पती विकी गोस्वामी सध्या ते केनियात राहत असल्याचं कळतं. 6 जून 2017 रोजी ठाणे कोर्टाने गोस्वामी आणि कुलकर्णीला फरार घोषित केलं होतं. यानंतर ममता कुलकर्णीची संपत्ती सील करण्यासाठीबाबतचा अर्ज पोलिसांनी कोर्टात केला होता.
कोर्टाने ममताची संपत्ती सील करण्याचा अर्ज प्रलंबित ठेवला होता आणि दोन्ही फरार आरोपींना हजर राहण्यासाठी एक संधी दिली होती. परंतु दोघेही कोर्टात हजर राहण्याची कोणतीही शक्यता नसल्याचं समोर आल्यावर न्यायाधीशांनी तिची संपत्ती जप्त करण्याचा आदेश दिला.
2016 मध्ये एप्रिल आणि मे महिन्यात ठाणे पोलिसांनी 2000 कोटी रुपयांच्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला होता. या प्रकरणी अभिनेत्री ममता कुलकर्णी आणि विकी गोस्वामीचं नाव समोर आलं होतं.
कल्याणमध्ये 12 एप्रिल रोजी पहिल्यांदा एका नायजेरियन ड्रग डिलरला अटक करण्यात आली होती. नायजेरियन डिलरच्या माहितीवरुन, ठाणे पोलिसांनी 13 एप्रिल 2016 रोजी दोन आरोपींना अटक करुन तब्बल 12 लाख रुपयांचं एफेड्रिन जप्त केलं होतं.
या दोन्ही तरुणांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पुण्यातून मयूर स्वामी नावाच्या फॅक्टरी मॅनेजरच्या मुसक्या आवळल्या. या सगळ्यांच्या माहितीनंतर सोलापूरच्या अॅव्हॉन लाईफसायन्सेस ऑरगॅनिक कंपनीवर छापा मारण्यात आला. या कंपनीतून 2000 कोटी रुपये किंमतीचं एफेड्रिन ड्रग्ज सापडलं.
एफेड्रिन पावडरचा उपयोग नशा करण्यासाठी होतो. त्याचा वापर पार्टीमध्ये लोकप्रिय असलेल्या मेथेम्फेटामाईनचं उत्पादन करण्यासाठी केला जातो.