Sunday, January 20

अब्रु वाचविण्यासाठी आलोकनाथ यांचा नुकसानीचा दावा

मुंबई, बॉलिवूडचे ‘संस्कारी बाबू’ आलोकनाथ यांच्यावर प्रसिद्ध निर्मात्या-दिग्दर्शिका विनता नंदा यांनी बलात्काराचा आरोप केला होता. त्यानंतर आता आलोकनाथ यांनी विनता नंदांवर कायद्याचा आधार घेत अब्रूनुकसानीचा दावा ठोकला आहे. काही दिवसांपूर्वी विनता नंदा यांनी फेसबुक पोस्टद्वारे ’20 वर्षांपूर्वी बॉलिवूडमधील एका संस्कारी अभिनेत्याने बलात्कार केला होता’ अशा आशयाची पोस्ट केली होती.
‘संस्कारी अभिनेता’ असे म्हणल्यामुळे संशयाची सुई ही आलोकनाथ यांच्यावर होती. सध्या सर्वच क्षेत्रात #MeTooचे वारे वाहत आहेत. त्यामुळे सर्वच क्षेत्रातील अनेक दिग्गज नावे या संदर्भात समोर येत आहेत. विनता नंदा यांच्यानंतर काही इतर अभिनेत्रींनीही त्या आलोकनाथ यांच्यावर गैरवर्तनाचा आरोप केला आहे. या पोस्टमुळे माझी मानहानी झाल्याचे सांगत आलोकनाथ यांनी विनता नंदा यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा केला आहे.
आलोकनाथ यांनी नंदा यांच्याविरोधात तक्रार दाखल करत या सर्व आरोपांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. नंदा यांच्या आरोपानंतर अभिनेत्री संध्या मृदुल, हिमानी शिवपुरी, सहाय्यक दिग्दर्शिका सलोनी चोप्रा यांनीही आलोकनाथ यांच्यावर गैरवर्तनाचे आरोप केले आहेत. याचबरोबर प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई, साजिद खान, गायक कैलाश खेर यांच्यावरही #MeToo अंतर्गत गैरवर्तनाचे आरोप केले आहेत.