Sunday, January 20

अखेर आलियासोबतच्या नात्याविषयी रणबीरने सोडलं मौन

अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. या चित्रपटाच्या शूटिंगपासूनच रणबीर- आलियाच्या नात्याविषयी चर्चा होऊ लागल्या. सोशल मीडियावर व्हायरल झालेले दोघांचे फोटो असो किंवा मग सोनम कपूरच्या रिसेप्शनला या जोडीने एकत्र लावलेली हजेरी असो, रणबीर- आलिया एकमेकांना डेट करत आहेत का, असा प्रश्न अनेकांच्या मनात डोकावू लागला. प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत आता दोघंही एकमेकांविषयी मोकळेपणानं बोलू लागले असून रणबीरने आलियाविषयी नुकताच एक खुलासा केला आहे.
‘एनडीटीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत रणबीरने आलिया त्याची ‘क्रश’ crush असल्याचं स्पष्ट केलं. तर आलियानेही काही दिवसांपूर्वी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत रणबीर कपूर तिला सर्वाधिक आवडत असल्याचं सांगितलं. त्याचबरोबर लोक आमच्या केमिस्ट्रीबद्दल बोलू लागले आहेत याचा मला आनंदच आहे असंही ती म्हणाली. त्यामुळे या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी शिजतंय, हे या मुलाखतीतून स्पष्ट होतंय असं म्हणायला हरकत नाही.
रणबीर आणि आलियाने सोनम कपूरच्या रिसेप्शनला एकत्र हजेरी लावली होती. त्यानंतर आलियाने तिच्या इन्स्टाग्रामवर रणबीरसोबतचा फोटोसुद्धा शेअर केला होता. तेव्हापासून या दोघांच्या नात्याविषयीच्या चर्चांना उधाण आलं होतं.
येत्या काही दिवसांत हे दोघंही चित्रपटाची शूटिंग पूर्ण करण्यासाठी बल्गेरियाला रवाना होणार आहेत. ‘ब्रह्मास्त्र’मध्ये या दोघांसोबतच अमिताभ बच्चन आणि मौनी रॉय यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. पुढच्या वर्षी ऑगस्टमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.